राजकीय

*चिमूरच्या विकास आराखड्याला त्वरित मंजुरी देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

* स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर अग्रस्थानी राहणार*

Download Aadvaith Global APP

* शहीद क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्म्यांना अभिवादन*

चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ही शहिदांची भूमी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील आमदार कीर्तीकुमार भांगडीया अत्यंत आग्रही असतात. चिमूरच्या विकासाची ब्लू प्रिंट त्यांनी तयार केली आहे. या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून त्याला त्वरित मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चिमूर येथे शहीद क्रांतीदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री कीर्तीकुमार भांगडीया, किशोर जोरगेवार, कृष्णा गजबे, देवराव होळी, माजी आमदार मितेश भांगडीया, सुधीर पारवे, संजय धोटे, हभप संदीपाल महाराज, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.
1942 च्या क्रांती पर्वात चिमूरच्या ज्या सुपुत्रांनी आपले बलिदान दिले, त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ते दिवस मंतरलेले होते. सर्वांचा एकच ध्यास होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाणीतून आणि शब्दातून तरुणांमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होण्याची नागरिकांची तयारी होती. 1942 च्या चलो जाव आंदोलनामध्ये देश पेटत असतांना भारतात सर्वात प्रथम चिमूर स्वतंत्र झाले, तशी घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनच्या आकाशवाणीवरून केली होती. इंग्रजांच्या राज्यात स्वतंत्र होणारे चिमूर हे देशातील पहिले गाव ठरले. या स्वातंत्र्यलढ्यात 20 पेक्षा जास्त शहीद तर 20-25 लोकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. 1942 पासून सुरू झालेली क्रांतीची ही मशाल देश स्वातंत्र्य होईपर्यंत पेटत राहिली. या स्वातंत्र्यलढ्यात ज्या अज्ञात नायकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा सर्व अज्ञात नायकांचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पुढे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, चिमूरमध्ये आज अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया विकासासाठी अत्यंत आग्रही असतात. विकासाच्या कामांमध्ये त्यांचा पाठपुरावा खूप जबरदस्त असतो. त्यामुळे सर्व कामे मंजूर केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने समितीचे गठन करण्यात आले आहे. चिमूर हा स्वतंत्र जिल्हा नसला तरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची पदे मंजूर झाली आहे. त्यामुळे जेव्हा-केव्हा राज्यात स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाईल, त्यावेळी चिमूरचे स्थान सर्वात अग्रस्थानी राहील.
यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषापेक्षा दुप्पट मदत दिली आहे. अधिवेशन संपल्याबरोबर मदत वाटपाचे काम सुरू होईल. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल. याशिवाय पूर परिस्थितीमुळे ज्यांची घरे पूर्णतः किंवा अंशतः पडली आहे, जमीन खरडून गेली असेल किंवा जनावरे वाहून गेले असतील, त्या सर्वांना मदत मिळणार आहे. चंद्रपूर हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. धानाच्या बोनससाठी मंत्रिमंडळात आजच चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 2014 ते 19 राज्याने जनतेचे सरकार अनुभवले आहे. आज पुन्हा लोकाभिमुख सरकार राज्यात आले असून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनासाठी वेगवेगळे योजना सरकार राबविणार आहे. गत अडीच वर्षाच्या काळात विकास कामांसाठी निधीच उपलब्ध करून देण्यात आला नाही. केंद्राच्या अनेक योजना रखडल्या. मात्र, आता हे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून पंतप्रधान आवास योजना, हर घर जल योजना, उज्वला योजना व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चिमूरच्या इतिहासावर आणि शहीद क्रांतीवर अतिशय सुंदर माहितीपट तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिल्या.
यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते 800 ते 900 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात 294 कोटींचा मुख्य रस्ता, श्रीहरी बालाजी देवस्थान येथे सभागृह व परिसर सौंदर्यीकरण (किंमत 5 कोटी), नागभीड येथे क्रीडा संकुलाचे लोकार्पण (4 कोटी), हायब्रीड अन्युटी अंतर्गत 285 कोटींचा रस्ता, चिमूर तालुक्यातील सावरीबीड येथे 5 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि निवासी वसाहत आदींचा समावेश होता.

*चिमूर ही देशाला क्रांती देणारी भूमी – सुधीर मुनगंटीवार*
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरने भारतीय शहीद क्रांतीचा इतिहास लिहिला आहे. 1857 मध्ये स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला. त्यानंतर 1942 ला ऐतिहासिक चले जाव उठावात चिमूरच्या क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ही भूमी देशाला दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ते पुढे म्हणाले, येथील क्रांतिवीरांनी इंग्रजांचा युनियन जैक खाली उतरवून भारताचा तिरंगा फडकविला. इंग्रजांच्या काळातसुद्धा 1942 मध्ये तीन दिवस स्वतंत्र होणारे चिमूर हे पहिले गाव ठरले. एवढेच नाही तर भारत -चीन युद्धात सर्वात जास्त सूवर्णदान देणारा चंद्रपूर जिल्हा आहे. जगात सर्वात उष्णतेचे शहर म्हणून हा जिल्हा प्रसिद्ध असला तरी त्याचे नाव सूर्यपूर ऐवजी चंद्रपूर आहे. यातच या जिल्ह्यातील लोकांची सहनशीलता दिसून येते. दिल्ली येथे नवीन संसद भवनाची जी इमारत तयार होत आहे, त्या सेंट्रल विस्टामध्ये चंद्रपूरचे लाकूड उपयोगात येत आहे, असे त्यांनी सांगितले. नागपूर वरून उपमुख्यमंत्र्यांसोबत येताना धान्याच्या बोनसचा विषय त्यांना सांगितला असता उपमुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. त्वरित बोनस देण्याचे कबूल केले. हे जनतेचे सरकार आहे. सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा विश्वास या सरकारने दिला आहे. सांस्कृतिक कार्य विभाग माझ्याकडे असल्याने आता दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम हा शब्द उच्चारावा. या क्रांती दिनापासून सर्वांनी याबाबत संकल्प करावा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते चिमूर येथील शहीद स्मारक येथे आणि किल्ला परिसरातील संत तुकडोजी महाराज आणि शहीद बालाजी रायपूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker