आपला जिल्हा

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे बल्लारपूर येथील कॅम्पस मध्ये शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून अभ्यासक्रम होणार सुरू

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

चंद्रपूर, गडचिरोली व परिसरातील मुलींना मिळणार कौशल्याचे धडे

चंद्रपूर :-श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईचे (एसएनडीटी) बल्लारपूर येथील नवीन प्रस्तावित कॅम्पस शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून बल्लारपूर येथील नगर परिषदेच्या नेताजी सुभाष चंद्र बोस डिजिटल स्कूल येथे सुरू होणार असून याठिकाणी विविध अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अनेक कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमांमुळे चंद्रपूर, गडचिरोली व परिसरातील मुलींना कौशल्याचे धडे मिळणार आहे. सोबतच महिला शिक्षणाची दारे खुली होणार आहे.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे केवळ महाराष्ट्र राज्यापूरते मर्यादित नसून भारतातील 7 राज्यांत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालये असून विद्यापीठाचे कार्यक्षेत्र इतर विद्यापीठांप्रमाणे मर्यादित नाहीत. एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ हे दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे. महर्षि कर्वे यांनी १९१६ मध्ये स्त्री शिक्षणाच्या उदात्त हेतूने विद्यापीठाची स्थापना केली.

विद्यापीठाचे मुख्यालय चर्चगेट मुंबई, येथे असून जुहू मुंबई, कर्वे रोड पुणे आणि श्रीवर्धन येथे सुध्दा विद्यापीठाचे परिसर आहेत. एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ हे असे एकमेव विद्यापीठ आहे जिथे खऱ्या अर्थाने मनुष्य विकासाची प्रयोगशाळा म्हणून नर्सरी शाळा, महिला अभ्यास केंद्र, दुरुस्त शिक्षण आणि डॉक्टरेट साठी संलग्न संस्था आहेत. देशातील इतर विद्यापीठाच्या विपरित एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या दुष्टी अद्वितीय आहे. राज्य सरकारच्या पूर्व संमतीने भारतात कुठेही महाविद्यालये/संस्था स्थापन करू शकणारी नाविण्यपूर्ण विद्यापीठ आहे 50 हजारांवर विद्यार्थीनी येथून शिक्षण घेतात.

विदर्भातील दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता याव्या म्हणून आता चंद्रपूर जिल्हयात विद्यापीठाचे नवे कॅम्पस आकाराला येत आहे. चंद्रपूर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. औद्योगिक व नैसर्गिक दृष्टया हे शहर समृध्द जरी असले तरी हा भाग ग्रामिण भागासोबत जोडला असल्यामुळे येथील महिलांचे अनेक प्रश्नही कायम आहेत. येथील नैसर्गिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घटकांवर काम करण्याच्या अनुषंगाने हे परिसर महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबईच्या कॅम्पस च्या माध्यमातून प्रस्तावित महर्षि कर्वे महिलास क्षमीकरण परिसर, बल्लारपूर, जि. चंद्रपूर हे महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने सोबतच त्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टी प्राप्त व्हावी याकरिता या परिसराचा फायदा होणार आहे.

श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री यांचा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पस साठी विशेष पुढाकार विद्यापीठाचे नवे कॅम्पस ५० एकर जागेत उभे राहणार आहे.

विद्यापीठाच्या नवीन कॅम्पस बांधकामा करिता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय तथा पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून प्राधान्याने महिला शिक्षणाची संधी येथील मुलींना उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याकरिता मौजे विसापूर ता. बल्लारपूर येथील ५० एकर जागा त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विद्यापीठास उपलब्ध व्हावी याकरिता प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. यास पुढाकार म्हणून जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी देखील सकारात्मक प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यामुळे लवकरच जागा विद्यापीठास मिळेल व बांधकामाला सुरुवात होईल आणि नवे कॅम्पस आकाराला येईल. सदर कॅम्पस ची काही वैशिष्ठ्ये देखील राहणार आहे.

1. विद्यापीठाचे बल्लारपूर येथील परिसर हे “मातृत्व” या संकल्पनेवर आधारीत असणार आहे.

2.या परिसराच्या माध्यमातून विविध पारंपारिक अभ्यासक्रमा सोबतच महिलांना सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी नव्याने अनेक अभ्यासक्रम शिकविले जाणार आहे. जेनेकरून त्यातून महिलांमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक मूल्यांचा विकास होईल.

3. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता युथ फेस्टिवल चे आयोजन होईल येथील विद्यार्थिनींना पारंपरिक अभ्यासक्रम सोबतच येथील झाडीपट्टी कलावंतांसाठी नाट्य, नृत्य व इतरही कलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

4.ग्रामिण महिलांना विचारात घेऊन सामुदायिक केंद्र स्थापन करून त्यातून ग्राममविकासाला चालना मिळेल व ग्रामीण मुलींना रोजगार मिळेल असे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

5.चंद्रपूर येथील परिसरातील विद्यार्थीनींना मुंबई व पूर्ण या ठिकाणी सांस्कृतिक व शैक्षणिक देवाण घेवाण तसेच व्यावसायिक आदान प्रदान करता येईल मुंबई, पुणे तसेच इतर विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना चंद्रपूरच्या मातृसंकुलात शिकण्याची व ग्रामीण संस्कृती समजून घेण्याची संधी मिळेल.

6. या परिसराची इमारत बांधकाम करताना सांस्कृतिक मूल्यांना चालना मिळेल हे लक्षात ठेवूनच बांधकाम केले जाणार आहे यात सुसज्ज ग्रंथालय देखील राहणार आहेत.

7.भाषिक शिक्षणाला महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे.

8.मुलींना स्वतःचे स्वरक्षण करता यावे यासाठी प्रशिक्षित केले जाईल. या करिता विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहे.

9.क्रिडा सुविधांनी युक्त परिसरीला प्राधान्य (इनडोअर, आऊटडोअर व्यायामशाळा, योगकेंद्र इत्यादी)

10, समुदाय आधरित प्रशिक्षण देण्यासाठी सामुदायिक केंद्राची निर्मिती.

11. पर्यटनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे पर्यटनाला उपयोगी हर्होइल असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाईल.

12. सर्व जाती, पंथ आणि संस्कृतीच्या स्त्रियांचा सन्मान करणारे आणि बौध्दिक कुतूहल, ज्ञानाचा शोध, शैक्षणिक स्वातंत्र्य आणि सचोटीचे महत्व देणारे शैक्षणिक वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी हे परिसर उपयोगी ठरेल.

13. बहू अनुशासनात्मक दृष्टिकोन आणि ट्रान्स डिसीप्लीनरी सहयोगांसह टीमवर्कच्या परिणामी समन्वय राखण्याचे काम येथून होईल.

14. शैक्षणिक अभ्यासक्रमाला मल्टीमिडीया, वेब आधारित स्वरुपात रूपांतरित करण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न येथून होणार आहे.

सदर कॅम्पस च्या माध्यमातून वरिल उद्दिष्टे साध्य व्हावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत राहणार आहेत.

कौशल्याधारित आणि विद्यार्थीकेंद्री अभ्यासक्रमांची निर्मिती

चंद्रपूरमधील बल्लारपूर येथील संकुलामध्ये दिले जाणारे शिक्षण केवळ पदवीपुरते नसावे, तिथल्या परिसरास,नैसर्गिक परिस्थितीस अनुसरून रोजगारांच्या आणि स्वयंसिद्ध होण्याच्या सुयोग्य संधी विद्यार्थिनींना मिळवून देणारे असावे ही विद्यापीठाची भूमिका आहे. चंद्रपूर जिल्हयातील महिला मुख्यत्वाने केंद्रस्थानी असल्याने तेथील भौगोलिक, नैसर्गिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिसर व जीवन लक्षात घेऊनच चंद्रपूरच्या परिसरातील वातावरणास पोषक असे शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमांची योजना असेल.

2023-24 च्या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी करताना चंद्रपूरमधील आणि आसपासच्या परिसरातील व्यवसाय उद्योग, गरजा, पर्यावरण या बाबींचा विचार करण्यात येत आहे. कौशल्य विकासासाठी 30 ते 60 तासांमध्ये (2-4 क्रेडिट) लहान अभ्यासक्रम, एका वर्षात प्रमाणपत्र, 2 वर्षात पदविका, 3 किंवा 4 वर्षात पदवी, पुढे पदव्युत्तर पदवी अशी चढती रचना उपलब्ध करून दिली जाईल. कोणत्याही पायरीनंतर बाहेर पडलेली विद्यार्थिनी पुन्हा परत येऊन पुढील शिक्षण घेऊ शकेल. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये इंटरियर डिझाईन आणि अन्नपदार्थ प्रक्रिया व उत्पादन या विषयांतील बि.वोक. पदवी; तसेच रुग्णालये, खनिज व वन-उत्पादनांवर आधारित उद्योग यासाठी व्यवस्थापन कौशल्य विकसित करणारे बि. एम्. एस्. पदवी अभ्यासक्रम सुरू होतील.

हे सर्व अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा आदर्श पुरावा ठरावेत.एसएनडीटी महिला विद्यापीठाचे बल्लारपूर येथील कॅम्पस सुरु होण्यासाठी मा.मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा आणि पूर्ण जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे सहकार्य लाभलेआहेत. सोबतच बल्लारपूर नगर परिषदेनेही यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. महिला शिक्षणाकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे विशेष.

पत्रकार परिषदेला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, विभाग प्रमुख डॉ जय श्री शिंदे व सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड उपस्थित होते.

अभ्यासक्रम व इतर आवश्यक माहितीसाठी संपर्क – डॉ. बाळू राठोड, सहायक कुलसचिव, एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबई (9881323543)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker