आपला जिल्हा

ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

चंद्रपूर, दि. 29 : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबादारी जास्त आहे. त्यामुळे घड्याळाकडे पाहून काम करू नका तर गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकांनी तन-मनाने काम करावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, श्याम वाखर्डे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देता आले नाहीत, असे सांगून पालकमंत्री  मुनगंटीवार म्हणाले, यावर्षी तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्त केवळ 45 ग्रामसेवक आदर्श नाही तर या जिल्ह्यातील प्रत्येकच ग्रामसेवक आदर्श असला पाहिजे. तेव्हाच हा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल. आपले राज्य ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलेली ग्रामगीता हा गावाच्या विकासासाठी उत्कृष्ट असा ग्रंथ आहे. प्रत्येक सरपंच आणि ग्रामसेवकाने हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. कारण सरपंच हा त्या गावचा मुख्यमंत्री तर ग्रामसेवक हा मुख्य सचिव आहे. ज्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला नाही, त्यांनी आजपासून गावाच्या विकासाचा संकल्प करावा. आपण काय कृती करतो, यावर आदर्श समाजाची निर्मिती होईल.

शिक्षण व्यवस्थेबद्दल पालकमंत्री म्हणाले, शिक्षण क्षेत्रात खुप मोठी भरारी घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आजही देशात 25 कोटी लोक निरक्षर आहेत. हा आकडा आपल्या राज्यात 1 कोटी 75 लक्ष आहे. ही खरचं चिंतेची बाब आहे. उच्च शिक्षण घेतांना आपला परिवार आणि समाजाला विसरून चालणार नाही. त्यामुळेच शिक्षणासोबत सामाजिक आणि सुसंस्कृत शिक्षणाची गरज आहे. शिक्षणावर सर्वात जास्त खर्च महाराष्ट्र करीत असून यासाठी 77 हजार कोटींची तरतूद केली आहे. 100 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये 9 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेचे असतात. उर्वरीत 91 विद्यार्थी हे विना अनुदानित शाळांमधून येतात. याचाही विचार या निमित्ताने करावा. गत काळात आपण जिल्ह्यातील 1500 शाळांना ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. आपला विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

तत्पूर्वी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कॉफीटेबल बुकचे विमोचन तर झेडपी चांदा स्टुडंट वेब पोर्टल व मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक राजू पिदूरकर, हनुमान इनामे, श्यामकुमार ठावरी, राजेश कांबळे, मिनाक्षी राऊत, कामसेन वानखेडे, निराशा पाखमोडे अशा 45 ग्रामसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गटविकास अधिकारी मंगेश आरेवार (भद्रावती), राजेश राठोड (चिमूर), भागवत रेजीवाडे (जिवती), मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातेकर या अधिका-यांनासुध्दा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मार्ट ग्राम योजनेचा पुरस्कार ब्रम्हपुरी तालुक्यातील जवराबोडी (मेंढा) या ग्रामपंचायतीला देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी, संचालन एकता बंडावार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक / सेविका आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker