आपला जिल्हा

3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा ॲग्रो – 2024 चे आयोजन

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 कृषी व पशु प्रदर्शनासह खिचडी महोत्सव

सांस्कृतिक कार्यक्रम व आकर्षक बक्षिसांचीही मेजवानी

चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.

या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.

43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :

आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.

पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम 

दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.

शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे 

कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.

              कृषी प्रदर्शन 

शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

          300 च्या वर स्टॉल 

दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker