आपला जिल्हा

*पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील*

 *चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन व लोकार्पण*

चंद्रपूर,दि.23: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना जाहिर केली. या योजनेंतर्गत चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यांना 300 कोटी रुपये मिळाले असून या क्षेत्रातील 90 टक्के गावे नळजोडणीद्वारे जोडली गेली आहेत. या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

जलजीवन मिशन अंतर्गत शंकरपूर येथे चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यातील 300 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे आभासी पदधतीने लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, अधीक्षक अभियंता प्रशांत बुरडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ओमराज हेडाऊ, कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जलजीवन मिशन अभियानामध्ये केंद्र शासनाचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के सहभाग आहे. ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, या अभियानांतर्गत 32 हजार गांवाचे डिपीआर तयार करण्याचे कार्य केले. पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सर्वात मोठे काम या क्षेत्रात झाले आहे. नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. विदर्भ मुबंईला मागे टाकत असून रस्त्यांची उत्कृष्ठ अशी कामे या क्षेत्रात झाली आहे.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, नळ योजनेतून 40 लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होत होता, आता 55 लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होणार आहे. विज बिलाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना सोलर प्रणालीवर करण्यात आल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून घरपोच पिण्याचे पाणी मिळत असल्याने महिलांचा त्रास कमी झाला असून पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. जलजीवन मिशन योजनेतंर्गत चांगले काम या क्षेत्रात करा, निकृष्ठ कामे केल्यास दोषींवर योग्य ती कार्रवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले, केंद्र सरकार जल जीवन मिशन देशात राबवित आहे. देशात व राज्यभरात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. हर घर नल से जल या योजनेच्या माध्यमातून महिलांचा त्रास कमी होणार आहे. घराघरात पाणी पाहोचविणे व पाणी देणे यापेक्षा पुण्याचे कोणतेही मोठे काम नाही. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळपास 300 कोटी रु. निधी या क्षेत्रासाठी मिळवून दिला आहे. जलजीवन मिशन अतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा सर्वप्रथम व सर्वाधिक लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या क्रांतीभुमीला मिळाला आहे. तसेच या क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्रातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे म्हणाले, जलजीवन मिशन हा केंद्रशासन पुरस्कृत उपक्रम आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल याप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक नळ जोडणीद्वारे 55 लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अस्तित्वात असलेल्या नळ योजनेतून 40 लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होत होता, आता 55 लिटर प्रतिदिन प्रतिमाणसे पाणीपुरवठा होणार आहे. ज्या गावात नळयोजना नाही, त्या गावात नवीन नळयोजना तयार करून पिण्याचा पाणीपुरवठा करायचा आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत 1303 योजनेतून 1470 गावांना गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट तसेच योजना तयार करण्यात आली आहे. या नळयोजनेतून सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

तत्पुर्वी, मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भुमीपुजन पार पडले.

कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे तर आभार राजू देवतळे यांनी मानले. यावेळी श्री. कांबळे, घनशाम डुकरे, प्रकाश वाकडे, वसंत वारजूरकर, राजु देवतळे, राजू झाडे,मनिष तुमपल्लीवार,माया नन्नावरे व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker