आपला जिल्हा

सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे आवश्यक – जिल्हाधिकारी विनय गौडा

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश

चंद्रपूर, दि. 25 : निवडणूक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केले.

नियोजन सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, तहसीलदार विजय पवार, प्रभारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अतुल जताळे, पॅरा ऑलंपिकमध्ये सूवर्ण पदक विजेते व निवडणूक विभागाचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर नईमुद्दीन शेख उपस्थित होते.

‘नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ हे यावेळेसच्या मतदार दिनाचे घोषवाक्य आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात संक्षिप्त मतदान पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. अर्हता दिनांक 1 जानेवारीप्रमाणेच आता वर्षभर 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखेपर्यंतसुध्दा मतदार यादीत नाव नोंदणी करता येते.

लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाला सर्वात जास्त महत्व आहे. त्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये असणे आवश्यक असून आपले नाव अचूक आहे का, यासाठी मतदारांनी यादी तपासून घ्यावी. नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूका पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सद्सद् विवेक बुध्दी वापरून नागरिकांनी मतदान करावे. आपला हक्क अतिशय पारदर्शकपणे वापरला तरच देश मजबूत होईल. चंद्रपूर शहरात गत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे येणा-या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

मतदार यादीत नाव नोंदवा : अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे

लोकसभा आणि इतर निवडणुका आता जवळ आल्या आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे आवश्यक आहे. नवमतदारांनी आपले नाव नोंदवून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनाही नाव नोंदविण्यास सांगावे, असे  देशपांडे म्हणाले.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या, 18 वर्षांवरील सर्वांनी मतदान करावे. आताच आपण सर्वांनी शपथ घेतली आहे. आगामी निवडणुकीत पारदर्शकपणे मतदान करा. तर सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. म्हणाले, भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी आहे. मतदान करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्यही आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी  गौडा यांनी उपस्थितांना मतदार जागरुकतेची शपथ दिली. तसेच निवडणूक विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर नईमुद्दीन शेख यांचा सत्कार केला.

उत्कृष्ट कार्याबद्दल यांचा झाला सत्कार :

मतदान प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आनंद मगर, प्रशांत लोखंडे, विजया राऊत, मनोज सातभाई, रमेश कोकरे, रामकृष्ण नागरगोजे, राजेश पवार, प्रकाश होळंबे, ललिता रायपुरे, मोरेश्वर मेश्राम, संगिता ढेंगळे, अरुण कोवे, दिलीप आत्राम यांचा समावेश होता.

नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र :

वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीमध्ये नव्यानेच नाव नोंदविणारे तेजस्विनी भोयर, प्रिया भोयर आणि विवेक झाडे या नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले.

सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश :

लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय ते महानगर पालिकेपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker