जागतिक कामगार दिना निमित्त सांगोला नगरपरिषद व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

सांगोला : दि. १ मे जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषद व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी सांगोला नगरपरिषद कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषद आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे विविध आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची दखल घेऊन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन मुख्याधिकारी डॉ. गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस इंडियन मेडिकल असोसिएशन सांगोलाचे अध्यक्षा डॉ. संध्या गावडे, उपाध्यक्षा डॉ. नेहा पाटील, सचिव डॉ. संगीता पिसे, कोषाध्यक्ष डॉ. शीतल येलपले उपस्थित होते. या आरोग्य शिबिरामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. गावडे, डॉ. पिसे, डॉ. केळकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पाटील, डॉ. गावडे, डॉ. केळकर, डॉ. भोसले, डॉ. देवकाते, डॉ. बंडगर, अस्थिरोगतज्ञ डॉ. गवळी, डॉ. लवटे, डॉ. भोसले, नेत्ररोगतज्ञ डॉ. शिंदे, फिजिशियन डॉ. डोंबे, डॉ.गायकवाड, डॉ.नष्टे, डॉ. माळी इ. तज्ञ डॉक्टरांनी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळेस मोफत औषधे, रक्त तपासणी व ईसीजी इ. वैद्यकीय सुविधांचा लाभ कर्मचारी यांनी घेतला. कार्यालय अधिक्षक स्वप्नील हाके, आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड, शहर समन्वयक प्रसाद जिरगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.