सांगोला तालुक्यातील डोंगर पाचेगाव येथे घरात आढळले वृद्ध पती-पत्नीचे मृतदेह
दोन्ही मुले राहतात परगावी

सांगोला:डोंगर पाचेगाव (ता. सांगोला) येथीलं घरात वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमराव महिपती कुंभार (वय ६५) व सुसाबाई कुंभार (वय ५०, रा. डोंगर पाचेगाव ता. सांगोला) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलिस तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण – रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. मृत भीमराव कुंभार यांना समाधान व पांडुरंग अशी दोन मुले असून ते कामानिमित्त बाहेरगावी असतात. घरात भीमराव व पत्नी सुसाबाई हे दोघेच असतात. कुंभार यांचे घर शुक्रवारी सकाळपासून उघडले नसल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान शेजाऱ्यांनी त्वरित सांगोला पोलिस स्टेशनला कळवले. या घटनेची माहिती कळताच सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पंचनामा सुरू केला.
-
दरम्यान सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री उशीरा सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या मागे नेमके काय कारण आहे याचा शोध पोलिस अधिकारी घेत आहेत.