ऐन दुष्काळात माणगंगेच्या मदतीला कृष्णा धावली; टेंभू सिंचन प्रकल्पातून माण नदीत सोडले पाणी

सांगोला : ऐन उन्हाळ्यात टेंभू योजनेच्या रुपाने माणगंगेच्या मदतीला कृष्णामाईच धावून आली. दुष्काळी परिस्थितीत सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सांगोला तालुक्यातील टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
दरम्यान रविवारी दुपारपर्यंत टेंभूचे पाणी बलवडी बंधाऱ्यात दाखल झाले होते.येत्या दहा दिवसांत माण नदीवरील बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पाण्याने भरून देण्यात येणार आहेत.सांगोला तालुक्यात फळबागा उन्हाळी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. शेतकऱ्यांनी टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडावे, अशी मागणी केली होती.
टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्णक्षमतेने भरून दिले आहे.
ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी माण नदीत सोडले असून, खवासपूर ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून दिले जाणार आहेत.