आरटीआय न्युज स्पेशलताजे अपडेट
Trending
हिंदुत्ववादी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्याच्या मुखात जय श्रीराम अन् संकष्टी चतुर्थी दिनीच मारला मटणावर ताव…!!!
देव देश धर्माचा भारतीय जनता पार्टीला विसर पडला की काय..?

सांगोला :देशातील हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चक्क जय श्रीरामच्या घोषणा देत संकष्टी चतुर्थी दिवशीच मांसाहारी जेवणावळी बसावल्या असल्याचे धक्कादायक प्रकार आता सांगोला तालुक्यातून समोर आला आहे. विशेष म्हणजे या महायुतीच्या या मेळाव्यात स्वतः खा निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यासमवेत बसून मटणावर ताव मारला असल्याची चर्चा आता सुरू आहे.
माढा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आतापासूनच लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असलेल्या मोहिते पाटलांनी सांगोला तालुक्यात दोन दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्याने माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही सांगोला येथे महायुती मधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना आणि तक्रारी मांडल्या मात्र या बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना चक्क मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मटणाचा बेत असल्यामुळे कार्यकर्त्यांची जेवणासाठी झुंबड उडाल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळाले. या ठिकाणी शाकाहारी जेवणाची व्यवस्था असताना सुध्दा मांसाहारी जेवणाकडेच कार्यकर्त्यांची जास्त ओढ असल्याचेही दिसून आले.
देव, देश आणि धर्मावर प्रेम करणारा राजकीय पक्ष किंवा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपली भूमिका मांडत असतो मात्र या पक्षातील नेत्यांनाच आता देव देश धर्माचा विसर पडला की काय..? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. गुरुवार दि २८ मार्च रोजी हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी संकष्टी चतुर्थी आहे हे माहीत असूनही या दिवशी मांसाहारी जेवणाच्या पंगती बसवल्याने सांगोला विधानसभा आणि संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.