गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करा…
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर -8975250567

सिनेट सदस्य प्रा. दिलीप चौधरी व प्रा. निलेश बेलखेडे यांची मागणी
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या बी. ए. , बी एस सी, बी कॉम इत्यादी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थी मागील सत्रामध्ये काही विषयात नापास झालेत. नवीन शैक्षणिक धोरण मागील सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक दिवस त्याचा अभ्यासक्रमांचा सिल्याबस व अभ्यास साहित्य उपलब्ध होऊ न शकल्यामुळे निकालामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेताना बसत आहे. अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहे.
काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. दिलीप चौधरी व प्रा. निलेश बेलखेडे यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली. विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन दोन्ही सिनेट सदस्यांनी तत्काळ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विशेष बाब म्हणून यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरी ऑन लागू करावे अशा पद्धतीची विनंती केली.
कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेऊ, सदरचा निर्णय हा अकॅडमिक कौन्सिलच्या अंतर्गत येत असल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवून त्यावर निश्चितपणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काहीतरी तोडगा काढू असे आश्वासित केलेले आहे.
त्यामुळे येणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीत विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची विद्यापीठाने काळजी घ्यावी. अशा स्वरूपाची मागणी दोन्ही सिनेट सदस्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.