ताजे अपडेट

दिशा समितीच्या अंमलबजावणीचा खासदारांकडून आढावा

मुख्य संपादक - हिमायुँ अली,मोबाइल नंबर -8975250567

चंद्रपूर, दि. 16 : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेले विषय तसेच केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) कार्यरत आहे. या समितीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा खासदार धानोरकर यांनी आज (दि. 16) घेतला.

नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला दिशा समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. नामदेव किरसान, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुटे व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अनेक लाभार्थी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर देण्यात यावी. तसेच वाढीव किमतीने बी- बियाणे, खतांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करावे. जलजीवन मिशन मध्ये कंत्राटदारांनी सिमेंट काँक्रेटचे रस्ते फोडून टाकले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याची डागडुजी करावी, तसे आदेश संबंधित विभागाने कंत्राटदारांना द्यावे. कुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने प्रभावी योजना राबवाव्यात. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे.

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होत असली तरी रेतीघाटापासून वाहतुकीचा खर्च खुप जास्त येत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. मोबाईलची रेंज राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने टॉवरचे काम गतीने करावे. वरोरा ते माजरी रेल्वे स्टेशन दरम्यान टाकण्यात येणा-या तिस-या रेल्वे लाईनचे काम भुसंपादनासाठी दिलेल्या जमिनीवरच करावे, अतिरिक्त जागेवर काम करू नये. राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना कंत्राटदारांकडून रस्त्यावरील प्रवासी निवा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सदर प्रवासी निवारा कंत्राटदारांनी बांधून द्यावे.

वरोरा –चिमूर महामार्ग अतिशय उंच असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. शिवाय महामार्गावरील सर्व पाणी लगतच्या शेतात जात असल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी इतरही विषयांचा आढावा घेतला. बैठकीत खा. डॉ. नामदेव किरसान यांनी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा संबंधित विभागाला सुचना केल्या. संचालन आणि सादरीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुडे यांनी केले.

या विषयांचा आढावा :दिशा समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, खनीज विकास, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महानेट, विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शिक्षण व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker