ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन उत्साहात साजरा समुदाय सहभाग आणि विविध संवर्धन कृती उपक्रमांनी सजलेला दिवस
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर -8975250567

चंद्रपुर:आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता, अधिवास सुधारणा आणि समुदायाच्या सहभागातून संवर्धन या बाबींवर भर देण्यात आला.
या निमित्ताने एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेखाली वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. यामध्ये १९ ठिकाणी एकूण २२०० हुन अधिक रोपांची लागवड करण्यात आली, ज्यामध्ये ५४० स्थानिक ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, इको विकास समितीचे सदस्य आणि वनकर्मचारी सहभागी झाले.
तसेच झिरो वेस्ट ताडोबा उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहिमा ९८ ठिकाणी राबवण्यात आली, ज्यामध्ये ४२५ सहभागी व्यक्तींनी ३२० किलोंपेक्षा अधिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावला. या उपक्रमांमुळे जंगल परिसरात प्लास्टिक आणि अन्य घनकचरा कमी करण्यास मदत झाली, तसेच स्थानिक समुदायांमध्ये कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन याविषयी जनजागृतीदेखील झाली.
खडसंगी वन परिक्षेत्रातील सातारा गावात, झिरो वेस्ट ताडोबा प्रकल्पाअंतर्गत घनकचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहन (ई-वाहन) सुरू करण्यात आले. या वाहनाचे उद्घाटन आनंद रेड्डी (उपसंचालक, कोअर) यांच्या हस्ते, सातारा गावचे सरपंच श्री. गजानन गुळदे व इतर इको विकास समिती सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले. हे वाहन बफर गावांमध्ये पर्यावरणपूरक आणि नियोजित कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
तसेच मोहरली प्रवेशद्वार संकुलात नऊ दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. हे वाहन वन क्षेत्रात गस्त व देखरेख वाढवण्यासाठी वापरले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन मणिकंदा रामानुजम (मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर) आणि प्रभुनाथ शुक्ला (क्षेत्र संचालक, TATR) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्थानिक वन कर्मचारी, इको विकास समिती सदस्य, मार्गदर्शक आणि वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, मोहर्ली सभागृहात बंडू धोतरे (इको प्रो) यांच्या मार्गदर्शनाखाली सापांविषयी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. सदर सत्राचा उद्देश स्थानिक ग्रामस्थ आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना साप संवर्धनाचे महत्त्व व सांपासोबत सुरक्षित सहजीवनाची गरज याबाबत माहिती देणे हा होता.
राष्ट्रीय स्तरावरील ताडोबाचा सहभाग अधोरेखित करत, राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ‘इको शॉप’ द्वारे सहभाग नोंदविन्यात आला.
या इको शॉपमधे स्थानिक समुदायांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू आणि हस्तकला उत्पादने मांडण्यात आली असून, शाश्वत उपजिविकेचे मॉडेल आणि व्याघ्र संवर्धनाविषयी जनजागृती यांचे उत्तम उदाहरण म्हणून हे प्रदर्शन पुढे आले आहे.
या सर्व उपक्रमांमधून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे व्याघ्र संवर्धनासाठीचे अधिवास व्यवस्थापन प्रयन, कचरा व्यवस्थापन, स्थानिक ग्रामस्थांच्या उपजिविकेचा विकास आणि समुदाय सहकार्य यांचा सुरेख संगम व एकात्मिक दृष्टिकोन स्पष्टपणे समोर येतो.