सगळ्या देशाला तुम्ही गंडा घालत आहात,पतंजलीच्या जाहिराती बंद करा
सुप्रीम कोर्टाचे आदेश

मुंबई : सगळ्या देशाला तुम्ही गंडा घालत आहात, सरकार डोळे बंद करून बसले आहे, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या फसव्या जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या काही जाहिरातींविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रिंट-इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमातून या फसव्या जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांची कंपनी पंतजली फुडला फटकारले आहे. पंतजलीकडून करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नाही. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. पंतजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना अवमान नोटीस पाठवली आहे. जाहिरातींमध्ये चुकीचे दावे न करण्याच्या त्यांचे आश्वासन न पाळल्याबाबत अवमान नोटीस पाठवली. त्याचा परिणाम पंतजलीच्या शेअर्सवर झाला आहे. शेअर बाजारात पंतजलीचे शेअर्स 105 मिनिटांत घसरले. यामुळे बाबा रामदेव यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कमी वेळामध्ये भारतीय बाजारामध्ये मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या पतंजली कंपनीला सुप्रिम कोर्टाचा दणका बसला आहे. पतंजली आयुर्वेद कंपनीने चुकीच्या दाव्यासह जाहिराज प्रसिद्ध केल्यामुळे पतंजली कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे परिणाम बुधवारी शेअर बाजारात दिसून आला. पंतजली फुडसच्या शेअरमध्ये चार टक्के घट झाली. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर 1620.20 रुपयांवर होते. ते 1,535.00 पर्यंत खाली आले होते. यामुळे कंपनीचे 105 मिनिटात 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक दिवसांपूर्वी मंगळवारी कंपनीचे मूल्य 58,650.40 कोटी रुपये होते. ते बुधवारी सकाळी 11 वाजता 56,355.35 कोटी रुपये झाले. पंतजली आयुर्वेद कंपनीने 10 जुलै 2022 रोजी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात अर्ध्या पानावर औषधांबाबत जाहिरात दिली होती. यामध्ये “अॅलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वत:ला व देशाला फार्मा व मेडिकल क्षेत्रातून होणाऱ्या अपप्रचारापासून वाचवा”, असा मथळा देण्यात आला होता. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात याचिका दाखल केली. त्यात पतंजली आयुर्वेदकडून अॅलोपॅथी व आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत अपप्रचार केला जात असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आरोप करण्यात आला. पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँण्ड ऑदर मॅजिक रेमेडिज अॅक्ट, 1954 व ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे थेट उल्लंघन केले जात असल्याचे देखील इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले. तसेच करोना महामारीच्या वेळी बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा देखील उल्लेख रिट याचिकेत करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने पतंजलीला हृदयविकार आणि दमा यासारखे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्यासही मनाई केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) द हिंदू वृत्तपत्रातील पतंजलीची जाहिरात आणि पत्रकार परिषदेसह न्यायालयात पुरावे सादर केले. योगाच्या मदतीने मधुमेह (शुगर) आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आता यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यापूर्वी कोविड-19 व्हॅक्सीन आणि आधुनिक औषधोपचारासंदर्भात पंतजलीकडून सुरु असलेल्या अभियानावर नोव्हेंबर महिन्यात कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती.