उद्घाटना आधीच मोडलेल्या खुर्च्या त्यावर कंत्राटदाराने फिरवलेला दुरुस्तीचा उतारा
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल) च्या सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम वादात

सांगोला : सांगोला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल) च्या सुशोभीकरण व नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ आज सोमवारी होणार असल्याचे समजते. उद्घाटना आधीच मोडलेल्या खुर्च्या त्यावर कंत्राटदाराने फिरवलेला दुरुस्तीचा उतारा यामुळे सांगोल्याच्या स्मृती भवनच्या नूतनीकरण व सुशोभिकरणाचे काम वादात सापडले आहे.
उद्घाटनाच्या अगोदरच आठ दिवसापासूनच रोज आठ ते दहा याप्रमाणे 40 ते 50 खुर्च्या या मोडलेल्या असून या सभागृहातील खुर्च्याची अशी अवस्था असताना त्या खुर्च्या बदलाव्यात व सदरील कामाची चौकशी करावी याकरिता नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देखील केलेली आहे, परंतु नगरपालिकेचे प्रशासन याकडे कानाडोळा करत उद्घाटनाचा कार्यक्रम आज सोमवारी होणार आहे. मोडलेल्या खुर्च्या दुरुस्ती करण्यासाठी कामगार आलेले असून सदरील खुर्च्या दुरुस्त करून त्याच्यातील स्प्रिंग बसून वापरण्यात येणार असल्याचे नगर अभियंता अभिराज डिंगणे यांनी सांगितले. सदरील सभागृहाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना हा उद्घाटन सोहळा पार पडत असल्याने सांगोला शहरवासीयातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काम निकृष्ट दर्जाचे झालेले असताना उद्घाटन सोहळ्याचा एवढा अट्टाहास का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. उद्घाटना अभावी तुटलेल्या खुर्च्या, कोट्यावधी रुपये खर्चून देखील निकृष्ट दर्जाचे झालेले काम यामुळे सांगोल्याचे अहिल्यादेवी स्मृती भवन चांगले चर्चेत आले आहे, याबाबत मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर कामाचे,खुर्च्याची तपासणी करून त्याचे फिटिंग व दर्जा याबाबतचा अहवाल सादर करण्यास संबंधितांना सांगितलेले आहे. तसेच या सर्व कामाचे पाहणी केल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले जाणार नाही, सदरील काम हे अंदाज पत्रकाप्रमाणे केले आहे की?नाही याची पाहणी करून अहवाल सादर करावा,असे संबंधित नगर अभियंता अभिराज डिंगणे यांना सांगितले आहे. सदरील सभागृहाच्या नूतनीकरणासाठी टेंडर प्रमाणे 1 कोटी 49 लाख रुपयांचे इस्टिमेट असून उद्घाटनाच्या पत्रिकेवर मात्र तब्बल अडीच कोटी रुपयांच्या कामाचा उद्घाटन सोहळा असे छापलेले आहे, त्यामुळे या सभागृहाच्या नूतनीकरणासाठी नेमके किती? पैसे खर्च केले गेले याविषयी देखील स्पष्टता नसल्याचे दिसून येते. तसेच या सभागृहातील जुन्या लोखंडी खुर्च्या या चांगल्या अवस्थेत होत्या सदरील खुर्च्या या सांगोला शहरातील मिरज रोड लगत असलेल्या सदानंद हॉल या मंगल कार्यालयात असल्याचे समजते,याबाबत नगर अभियंता अभिराज डिंगणे यांना विचारले असता ते म्हणाले की,याबाबत काहीही माहिती नाही.सदरच्या खुर्च्या या नगरपालिकेने विकल्या का? कॉन्ट्रॅक्टरने विकल्या याबाबत देखील संभ्रम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सांगोला शहरात शासनाचा निधी आला असताना त्यातून चांगले काम होणे अपेक्षित असताना उद्घाटना आधीच तुटलेल्या खुर्च्या व निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सांगोल्याचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह चर्चेत आलेले आहे. हे सर्व असताना सांगोल्यातील विरोधी पक्षाची याबाबत नेमकी भूमिका काय? की विरोधी पक्ष ही यात सामील आहे काय? अशी चर्चा निमित्ताने शहर वासियातून केली जात आहे.