भाजपा सरकारला शेतकरी-सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही : शरद पवार
सांगोला येथील महाविकास आघाडीच्या जाहिर सभेत केले प्रतिपादन

सांगोला : गेल्या दहा वर्षापासून भाजप सरकारच्या हातामध्ये सत्ता जनतेने दिली आहे. परंतु यांच्या काळामध्ये शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी व आत्महत्याचे प्रमाण वाढले. या भाजपा सरकारला शेतकरी सर्वसामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. सध्या देशाची निवडणूक ही साधीसुधी उरलेली नाही .लोकशाही धोक्यात आहे .या सरकारने देशाला व लोकांना धोक्यात टाकले आहे .या सर्व गोष्टी वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केली.सांगोला येथील महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी मा .उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,माजी आमदार रामहरी रुपनर, माजी आमदार साळे, शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, भूषण राजे होळकर, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड ,पी.सी .झपके, शरद कोळी ,शिवसेना नेते संभाजीराजे शिंदे, साईनाथ अभंगराव, प्रशांत धनवजीर, सुरज बनसोडे, शेखर माने , जयमालाताई गायकवाड तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले, शरदचंद्र पवार हे कृषिमंत्री असताना हजारो कोटीची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती.सध्याचे आजचे भाजपा सरकार हे फक्त शेतकऱ्यांना भूल भुलय्या करण्यात व्यस्त आहे. एकीकडे हे सरकार उद्योगपतींचे हजारो कोटीचे कर्ज माफ करत आहे. तर सध्या सांगोला, माढा ,सोलापूर मध्ये भीषण दुष्काळ परिस्थिती असताना अजूनही दुष्काळ जन्य परिस्थितीचे सरकारचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामध्ये पण शंभर अटी घातले आहेत. शेतकऱ्याला सतत अडचणीत आणण्याचे काम हे भाजपा सरकार करत आहे.शेतीला भाव येतो तेव्हा भाजपा सरकार निर्यात बंदी करते. व शेतकऱ्याकडून त्याचा साठा झाल्याने आपोआपच त्याचा दर कमी होतो. शेतकऱ्याच्या गळ्यावर बसून गळचेपी करण्याचे काम हे भाजपा सरकार करत आहे. मोदींनी 2014 साली काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले. व त्यातून प्रत्येकी 15 लाख रुपये खात्यावर टाकण्याचे आश्वासन दिले. हे तर झालेच नाही. नंतर त्यांनी नोटाबंदी घडवून आणली. याचाही काही परिणाम झालेला नाही. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देतो हे भामटे आश्वासन त्यांनी दिले होते. तरुण सुशिक्षित आहे. पण हाताला रोजगार नाही.महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार संघामध्ये एक उद्योग धंदा आणू .यासाठी महाविकास आघाडीला मतदार वर्गाने साथ दिली पाहिजे. भाजपामुळे सांगोला तालुका पाच ते दहा वर्षांनी पाठीमागे गेला आहे. आज तालुक्यात कोणत्याही विकास कामाच्या गोष्टी करत असताना ते सर्व मीच केले आहे. असे फतवे पसरवले जात आहेत.
माजी नगरसेवक सुरज बनसोडे म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी तुम्हाला बाळूत्यात होता. तेव्हापासून पुढारी केले. पाणी आणले काय? नाही आणले काय? त्याचा मागासवर्गीयांना काय फायदा नाही. कारण शेती तुमच्या व पाणी नाही आणल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाळूमाफिया चे काम पण तुम्हीच करतात. त्यामुळे दोन्हीकडून तुमचाच फायदा. त्यामुळे अशा चोराला काय मतदान करायचे.
सांगोला तालुक्यात गणपतराव देशमुख खमक्या आमदार होता. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पाणी सोडले. ही निव्वळ आणि निवळ अफवा आहे. मोहिते पाटलांनी 50 वर्षात पाणी अडवले असे सांगितले जाते. मग त्यावेळी तुम्ही दोन चोरच त्यांच्यासोबत होता,हे मान्य करा.
भूषण राजे होळकर म्हणाले, भाजप सरकारने लोकशाहीवर घाला घालण्याचे आतापर्यंत काम केले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव आणण्याचे काम यांनी केले आहे. हे मुख्य न्यायाधीश यांनीही स्पष्ट केले आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम आतापर्यंत त्यांनी केले .उज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस देण्याच्या गोष्टी करायच्या व एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरच्या किमती वाढवायच्या. गोमाता म्हणायचे व दुसरीकडे गो हत्या करणाऱ्या कंपनीकडून भाजप सरकारने मोठा निधी घेतला आहे.
जिल्ह्यामध्ये गणपतराव देशमुख, सुधाकर परिचारक धोरण आखायचे व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून ते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबवले जात होते. परंतु आज जिल्ह्याची भाजपने दयनीय अवस्था करून ठेवली आहे. माझी उमेदवारी नाकारली परंतु जिल्ह्यातील लोकांनी गप्प बसू दिले नाही. या सरकारने गेली दहा वर्षे एकमेकांची जिरवा -जिरवी चे राजकारण केले आहे. किसान रेल्वे बंद केली. व तेच उत्तर देतात ती एक स्कीम होती. व बंद झाली. मग केंद्रापासून राज्यापर्यंत सत्ता खासदार-आमदार तुमचे मग कशी काय बंद झाली ?हा चिंतेची बाब आहे. माळशिरस व सांगोला तालुक्यातील जनतेचे कसे भांडण भिडून द्यायचे व आपली राजकीय पोळी कशी भाजायची हे यांच्या डोक्यात खुळ होते परंतु आता तसे होणार नाही .जनता आता हुशार झाली आहे. – धैर्यशिल मोहिते -पाटील