सांगोला शहराजवळ सायकल स्वारास उडवले
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मंगळवेढा येथील उद्योजकाचा मृत्यू

सांगोला: मंगळवेढा येथील उद्योजक व शीतल कलेक्शनचे मालक सुहास ताड यांचा सांगोल्याजवळ अपघाती मृत्यू झाला. हा अपघात आज सोमवारी सकाळी सांगोला पंढरपूर रोडवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
काल रात्री आठच्या सुमारास कारने मोटर सायकलला धडक दिल्यामुळे तिघा मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सकाळी पुन्हा अपघात घडल्याने सांगोला पंढरपूर रोड मृत्यूचा सापळा बनल्याची चर्चा सुरू आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे चारचाकी वाहने बेदरकारपण व वेगाने चालवून अपघातास निमंत्रण देत आहेत.
मंगळवेढा येथील व्यापारी सुहास ताड या सायकल स्वारास धडक देऊन घटनास्थळी न थांबता वाहनधारक वाहनासह पसार झाला आहे. सांगोला पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सदरील घटना घडली असल्याने सांगोला पोलीस स्टेशनने या अज्ञात वाहनधारकाचा तपास करावा अशी मागणी सांगोला सायकलर्स क्लब सांगोला यांनी केली आहे.
गेल्या दिवाळीपूर्वी त्यांचा मंगळवेढा येथे असलेला मॉल शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला होता. त्यातून ते कसेबसे सावरले होते आणि आज काळाने त्यांच्यावर घाला घातल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.