देश विदेश

कारसेवक म्हणून श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी काष्ठ पाठवणे अतीव आनंद देणारे – सुधीर मुनगंटीवार

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली चंद्रपूर-बल्लारपूर नगरी

सागवन काष्ठ अयोध्येला रवाना : पारंपरिक वेशभूषा, पताका अन् लोककलांनी रंगली शोभायात्रा

सुधीर मुनगंटीवार चे अंतःकरण रामनामाने ओतप्रोत -आचार्य गोविंददेव गिरी

 

चंद्रपूर, दि. ३० : भगव्या पताका.. केशरी झेंडे.. जागोजागी राम नामाची धून.. माता भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव… पारंपरिक वेशभूषेचा साज… लोककलांचा मेळा आणि तरुणाईच्या मुखातून ‘जय श्रीराम’चा जयघोष अशा उत्साहाच्या वातावरणाने बुधवारी चंद्रपूर आणि बल्लारपूर नगरी दुमदुमली. या उत्सवात भाविक रामभक्तीमध्ये आकंठ बुडाले होते.

 चंद्रपूर –गडचिरोलीच्या दंडकारण्यातील उच्चप्रतीचे काष्ठ अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणासाठी बुधवारी बल्लारपूर येथून जल्लोषात निघाले. त्यानंतर चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरापासून ते चांदा क्लब ग्राऊंडपर्यंत श्री राम नामाचा जयघोष करत हजारो संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत काष्ठ शोभायात्रा काढण्यात आली.

चांदा क्लब ग्राऊंड येथील सांस्कृतिक कार्यक्रमात  सुधीर मुनगंटीवार यांनी कारसेवक असल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. ‘चंद्रपुरातून पवित्र भावनेने आपण अयोध्येला काष्ठ समर्पित करत आहोत याचा आनंद वाटत आहे. मी अयोध्येतील कारसेवेत सहभागी झालो होतो. ‘मंदिर वही बनाएंगे..’ अशा घोषणा देत आम्ही अयोध्येत दाखल झालो होतो. आज त्या रामभूमीत वास्तवात भव्यदिव्य मंदिराचे निर्माण होत आहे. त्यामुळे कारसेवक असल्याचा अभिमान आणि आनंद आहे,’ असे  मुनगंटीवार म्हणाले.

अयोध्येत ‘जाणता राजा’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमितून आणि पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशातील काष्ठ अयोध्येत श्रीरामांच्या चरणी अर्पण होत आहे. वनमंत्री म्हणून आपल्याला दोन मोठे सौभाग्य प्राप्त झाले. शिवप्रतापदिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या नावाने झालेले अतिक्रमण पाडता आले आणि दुसरे म्हणजे अयोध्येत श्रीरामाच्या चरणी काष्ठ पाठविता येत आहे. याशिवाय मे महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरयू तिरावर ‘जाणता राजा’ या महानाट्याचा हिंदी भाषेत प्रयोग करण्याची माझी योजना आहे.-  सुधीर मुनगंटीवार,मंत्री, वने व सांस्कृतिक कार्य

सुधीर मुनगंटीवार चे अंतःकरण रामनामाने ओतप्रोत

श्रीरामनवमीचा दिवस अत्यंत अद‌्भूत असा आहे. आयुष्यात प्रथमच आपण चैत्र नवरात्र सोडून आळंदीच्या सीमेबाहेर आलो. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही अनुष्ठानापेक्षा राम मंदिराचे अनुष्ठान आपल्याला श्रेष्ठ वाटते. कारण काष्ठ समर्पण ही देखील श्रीरामाची सेवाच आहे. अष्टमीच्या दिवशी काष्ठ पूजनाचा सोहळा आयोजित करणारे  सुधीर मुनगंटीवार यांचे अंत:करण खऱ्या अर्थाने रामनामाने ओतप्रोत आहे. श्रीराम मंदिराच्या रक्षणासाठी अजिंक्य राष्ट्राची निर्मिती करायची आहे. जेणेकरून पुन्हा कुणी राम मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहू नये. आणि त्यासाठी  सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या महानुभावांची गरज भासणार आहे.- आचार्य गोविंददेव गिरी महाराज कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

काष्ठ पूजन आणि मंत्रोच्चार

या ऐतिहासिक सोहळ्याचा प्रारंभ बल्लारपूर येथून झाला. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत वाल्मिकी बांधवांच्या हस्ते प्रथम काष्ठ पूजन झाले. मंत्रोच्चार व पुष्पवृष्टीने वातावरण ढवळून निघाले. यावेळी उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, वन-पर्यावरण व जंतु उद्यान राज्यमंत्री डॉ. अरुण कुमार तसेच राज्यमंत्री रवींद्र जयस्वाल यांची उपस्थिती होती. यासोबतच अभिनेता अरुण गोविल, अभिनेत्री दीपिका चिखलिया, अभिनेता सुनिल लाहेरी यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच ज्यांच्या पुढाकारातून हा सोहळा संपन्न झाला ते राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

      शोभायात्रेचा उत्साह

चंद्रपूर येथील माता महाकाली मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. विविध चित्ररथ, देखावे व लोककलाकार नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार अशोक नेते, आमदार प्रा. अशोक उईके, आ. पंकज भोयर, आ. संजीव रेड्डी बोदकुलवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सौ. सपना मुनगंटीवार, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पुगलिया यांच्यासह वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

   कैलास खेर यांनी केले मंत्रमुग्ध

सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुश्राव्य रामधुनच्या कार्यक्रमाने चंद्रपुरातील रामभक्त मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कैलाश खेर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.  सुधीर मुनगंटीवार आणि गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते कैलाश खेर यांना गौरविण्यात आले. सुधीर मुनगंटीवार यांनी निमंत्रण दिल्यानेच आपण या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकलो, अशी भावना कैलाश खेर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, रामायणातील कलावंतांनी रामायण मालिकेतील प्रसंगांचे सादरीकरण केले.

   आतषबाजी अन् लेझर शो

रात्री उशिरा कैलाश खेर यांच्या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर चांदा क्लब मैदानावरील आकाश आतषबाजी आणि लेझर शो ने बहरून आले होते. आकर्षक असा लेझर शो उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेला. तर आतषबाजीने साऱ्यांनाच प्रफुल्लित केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker