दुर्दैवी घटना;शेततळ्यात बुडणाऱ्या भावास वाचवताना बहिणीचाही मृत्यू
सांगोला तालुक्यातील राजुरी गावावर शोककळा

सांगोला : शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या लहान भावास वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या चिमुरड्या बहिणाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.ही घटना सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास सांगोला तालुक्यात राजुरी (कुटे वस्ती) येथे घडली.
ओम आबा कुटे (वय ७) आणि प्रतीक्षा आबा कुटे (वय ११, दोघेही रा. राजुरी कुटे वस्ती, ता. सांगोला), असे मृत बहीण-भावांची नावे आहेत. दरम्यान, दोघांच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी हृदयविकाराने निधन झाले असून, दोघांच्या पश्चात आई, आजी-आजोबा, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरी (कुटे वस्ती) येथील आबा कुटे यांच्या घरामागे २०० फुटावर नारायण कुटे यांचे शेततळे आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने कुटे वस्ती येथील काही मुले जवळच विहिरीत पोहत होती. त्याचवेळी प्रतीक्षा व ओम दोघेही विहिरीवरील काठावर बसून पाय हलवत होते. त्यांना पोहता येत नाही म्हणून घराकडे पाठवले होते; परंतु ओमला पोहण्याचा मोह आवरला नाही. तो नारायण कुटे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला.पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडू लागला. बहीण प्रतीक्षा हिने पाहिले, तिलाही पोहता येत नसताना त्याला वाचवण्यासाठी तिने धाडसाने उडी घेतली. दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ झाले दोनही मुले दिसत नाहीत म्हणून मुलांची आई व आजी शेजारील मका पिकात शोध घेतला. तासभर सापडले नाहीत. दुपारी ४ च्या सुमारास ओमचे कपडे व सँडल नारायण कुटे यांच्या शेततळ्याच्या कडेवर दिसले. आई व आजीने आरडाओरड केल्याने रामचंद्र कुटे व बाबासाहेब कुटे यांनी धाव घेऊन शेततळ्यात उतरले. दोघांना बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृत प्रतीक्षा ही नाझरे येथील श्रीधर कन्या प्रशालेत इयत्ता पाचवीत शिकत होती तर ओम हा कुटे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिलीत शिकत होता. वार्षिक परिक्षेचा पेपर देऊन प्रतीक्षा ही घरी आली होती तर ओमही शाळेतून घरी आला होता. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटे वस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.