सांगोला शहरात हातगाड्यावरचा जुगार बिनदिक्तपणे शासनमान्य उद्योगा सारखा जोमात
मार्केट कमिटीच्या आवारातच हातगाड्यावरचा जुगार; जनावारांच्या बाजरातील व्यापारी,शेतकर्यांच्या पैशांवर डोळा

सांगोला : सांगोला शहरात गेल्या दोन वर्षापासून बिनदिक्तपणे सुरू असलेल्या हातगाड्यावरचा जुगार नियमितपणे शासनमान्य असलेल्या उद्योगासारखा कोणाचीही भीती व कायद्याचा कोणताही धाक न बाळगता जोमात सुरू आहे. या हातगाड्यावरच्या जुगाराने अनेक जणांना चुना लावलेला असून या हातगाड्यावरच्या जुगाराच्या गाड्यावर कारवाई करण्याचे धाडस सांगोल्याचे पोलीस करणार का? असा प्रश्न सांगोला शहरवासीयांतून आता विचारू जाऊ लागला आहे. सांगोला शहरातील स्टेशन रोड परिसरामध्ये हातगाड्यावरचा हा जुगार सुरू असून यात जुगार चालकाचेच सहा ते सात जण खेळाडू डमी जुगार खेळत असतात व ते देखील ग्राहक आहेत असे भासवून इतर लोकांना फसवून मोठ्या प्रमाणात हजारो लाखो रुपये या जुगारांमध्ये लावले जात असून यात सुरुवातीला पैसे लागतात परंतु त्यानंतर हातचालकीच्या बळावर अनेकजण अक्षरशः कंगाल होऊन आपल्या घरी निघून जातात. अशा प्रकारचा हा जुगार सांगोला शहरांमध्ये नियमितपणे दररोज शहरातील स्टेशन रोड, कडलास नाका या परिसरामध्ये सुरू असून हा जुगार आता गेल्या काही महिन्यांपासून सांगोल्याच्या मार्केट यार्डच्या आवारात देखील सुरू असून कोट्यावधी रुपयाची उलाढाल असलेल्या सांगोल्याच्या मार्केट यार्डच्या जनावरांच्या बाजारात हातगाड्यांच्या जुगाराची दोन गाडया दर रविवारी लावले जात असून या ठिकाणी राज्यातील विविध भागातील शेतकरी,व्यापारी जर्शी गाई, खिलार जनावरे, म्हशी व शेळ्याच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात त्यामुळे त्यांचेकडे मोठ्या प्रमाणात पैसा देखील असतो या पैशाच्या उलाढाली वर लक्ष ठेवूनच या ठिकाणी देखील हातगाड्यावरचा जुगाराचा खेळ बिनदिक्तपणे सुरू आहे. मार्केट कमिटीचे पदाधिकारी किंवा संचालक यांचा देखील यास अघोषित पाठिंबा आहे की काय? असा देखील संशय या निमित्ताने नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या मार्केट कमिटीच्या आवारातच अशा प्रकारचा हातगाड्यावरचा जुगारात नियमितपणे सुरू असल्याने ज्या गणपतराव देशमुख यांचे संपूर्ण आयुष्य निष्कलंक चारित्र्यवान नेता म्हणून राज्यभर ओळखले जातात, त्यांच्याच पक्षाच्या मार्केट कमिटीच्या आवारात अशा प्रकारचा जुगाराचा अड्डा लागत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सांगोला शहरातील अनेक भागांमध्ये पूर्वीपासूनच अनेक ठिकाणी हातगाड्यावरचा जुगार मटका व गुटखा हा नियमितपणे सरकारमान्य उद्योग असल्यासारखे अविरतपणे सुरू असून यास सांगोला पोलिसांचे अभय असल्याचेही बोलले जाते. पोलिसांनी कारवाई करायची म्हणले तरी कारवाई जुजबी केली जाते. विशेष म्हणजे सोलापूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्याचा सांगोल्यात असलेला एक कर्मचारीच या सर्व हातगाडयावरचा जुगार,मटका व गुटख्याची वसुली करत असल्याचीही जोरदार चर्चा सांगोला शहरात आहे. अशाप्रकारे सर्वसामान्य लोकांना दिवसाढवळ्या चुना लावणार्या नियमितपणे कोणाचीही भीती, कायद्याचा धाक न बाळगता सुरू असलेला हातगाड्यावरचा जुगार खरोखरच बंद होणार का? की नेहमीप्रमाणे मंथलीच्या जोरावरती हा जुगार अविरतपणे असाच सुरू राहणार? याकडे सांगोला शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.