नैसर्गिक व सहज – सुलभ जीवनशैलीमुळे मानवी अस्थिना बळकटी – डॉ.प्रसाद जोशी

सांगोला – मानवी शरीरातील विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमधील हाडांचा ठिसूळपणा ही एक जागतिक समस्या बनली असून सोप्या घरगुती उपायाने व सकारात्मक जीवनशैली मुळे हाडाची मजबुती टिकवून ठेवता येवू शकते, असे विचार फलटण येथील जोशी हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रसाद जोशी यांनी व्यक्त केले.सांगोला शहरातील श्री सिद्धी विनायक महिला ज्येष्ठ नागरिक संघ व धनगर समाज सेवा महिला मण्डल सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थी – चिकित्सा.शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ जोशी बोलत होते.सांगोला शहरातील नगरपालिका बचतगट इमारतीत रविवारी सदर शिबिर संपन्न झाले.या वेळी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा आशा सलगर,सचिव वर्षा इंगोले, यांच्यासह कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणी माने,स्वाती मगर, महिला सूत गिरणी चेअरमन कल्पना शिंगाडे, माजी प्राचार्य डॉ कृष्णा इंगोले, ह भ प माऊली ऊर्फ कृष्णाजी इंगोले आदि उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शन व्याख्यानात डॉ.जोशी यांनी दररोज किमान अर्धा तास कोवळ्या उन्हात बसून राहिल्यास व सकारात्मक,आनंदी जीवन अंगिकारली तर ज्येष्ठ नागरिकांना ओशध – गोळयाची गरज लागणार नाही,असे सांगितले.त्याच प्रमाणे हाडांची ठीसुळता,त्याची लक्षणे,कारणे,उपाय,प्रमाण यावर भाष्य केले.हाडे ठिसूळ झाल्यास कोणती काळजी घ्यावी,आहार कसा असावा,कॅल्शिअम प्रमाण किती असावे,प्रतिबंधात्मक उपाय कोणते यावर सविस्तर मार्गदर्शन केले.शिबिरात उपस्थित असलेल्या सत्तर ते पंचाहत्तर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. गुढगा,शस्त्रक्रिया,संभाव्य खर्च यावर भाष्य करताना योग,प्राणायाम,व्यायाम व आनंदी वृत्ती जोपासण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.कार्यक्रमात प्रास्ताविक व स्वागत आशाताई सलगर यांनी तर आभाप्रदर्शन डॉ कृष्णा इंगोले यांनी केले.