माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी कोणाच्या हाती?
धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. अनिकेत देशमुख, अभयसिंह जगताप, संजीवराजे निंबाळकर यांच्या पैकी एकाला संधी

सांगोला :माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारी साठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीवर गांभीर्याने चर्चा केली जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होऊन अनेक दिवस होत आले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारी उमेदवाराचे नाव अद्याप पर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. महायुतीचे उमेदवार विद्यमान खा.रणजीतसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली असून सांगोला तालुक्यातील तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात त्यांची प्रचार यंत्रणा कार्यरत झालेली दिसून येत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी तर्फे माढा ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाकडे असल्याने त्यांना अद्याप पर्यंतही आपला योग्य उमेदवार मिळाला नसल्याने उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
अकलूजच्या धेर्यशिल मोहिते- पाटील यांनी भाजपचे विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याने तसेच त्यांनी निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपासूनच माढा लोकसभा मतदारसंघात आपला संपर्क वाढवून जनतेशी भेट घेऊन आता माघार नाही अशा प्रकारे तयारी केल्याचे दिसून येत आहे, परंतु धैर्यशील मोहिते- पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी हातात घेणार का? याबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माढा मधून उमेदवारी मिळावी याकरिता चाचपणी केल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघात सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतली असून काल देखील त्यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली असून सदरील चर्चा सकारात्मक झाल्याचेही बोलले जात आहेत शरद पवार यांच्याकडे आजच्या घडीला धैर्यशील मोहिते-पाटील डॉ. अनिकेत देशमुख, अभयसिंह जगताप, संजीवराजे निंबाळकर हे चार उमेदवार इच्छुक असून या चार पैकी धैर्यशील मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतील का? याकडे सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेले आहे. याबाबत असे समजते की, मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा मगच त्यांच्या उमेदवारीबाबत विचार होईल अशी ही चर्चा आहे. तिकडे फलटणचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजीवराजे निंबाळकर हे देखील माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असून त्यांचा देखील विद्यमान खा. रणजीतसिंह निंबाळकर यांना कडाडून विरोध असून ते देखील ऐनवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढू शकतात असाही अंदाज राजकीय जाणकारातून व्यक्त केला जात आहे.
नुकतेच पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ.बाबसाहेब देशमुख यांनी देखील शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन डॉ.अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती.माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य असल्याने तसेच लगत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या विद्यमान खा. सुप्रिया सुळे या निवडणूक लढवीत असून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही राज्य पातळीवर चर्चेत असलेली लढत यावेळी होणार आहे . तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे असलेले प्राबल्य या सर्व गोष्टीचा विचार करून शरद पवार हे डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पारड्यात वजन टाकून त्यांना उमेदवारी देतील अशीही शक्यता या निमित्ताने राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे.
तरीपण शरद पवार हे नेमके कोणत्या क्षणी काय करतील हे कोणालाच आजपर्यंत कळले नसल्याने ऐनवेळी तिसराच उमेदवार देखील ते जाहीर करून माढ्यामध्ये धक्कादायक अशी देखील उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता ही बोलली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माढा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण चित्र स्पष्ट होऊन माढा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण? यावर ती शिक्कामोर्तब होईल हे मात्र नक्की.