शेतीच्या वादातून खुनी हल्ला; पाच आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी
सत्र न्यायालयाचा निकाल; जखमींना नुकसान भरपाईचे आदेश

सोलापूर : शेतीच्या वादातून आहेरवाडी (ता. द. सोलापूर) येथे सुरेश सासवे व त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी पाच आरोपींना अति. सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यातील फिर्यादी व जखमींना प्रत्येकी १० हजार रुपये नुकसानभरपाईचा आदेशही बजावण्यात आला.
संजय क्षेत्री, अभिमन्यू सासवे, शामराव सासवे, जगूबाई सासवे, रतनबाई सासवे अशी सक्तमजुरीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की,यातील फिर्यादी सुरेश धर्मण्णा सासवे व आरोपी यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन वहिवाटण्यावरून वाद सुरू होता. फिर्यादी जबरदस्तीने शेत कसत असल्यावरून आरोपी चिडून होते. घटनेच्या दिवशी २३ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी फिर्यादी आपली पत्नी, मुलगा, सून व नातवासह घरासमोर बसलेले असताना आरोपी रतनबाई व जगूबाई दोधी फिर्यादीच्या घरासमोर येऊन त्यांनी शिवीगाळ सुरू केली. पाठोपाठ संजय, अभिमन्यू, शामराव तलवार, काठ्यासह आले आणि त्यांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. यात फिर्यादी सुरेश सासवे त्यांची पत्नी इंदुबाई सासवे, गुंडूराज सासवे, उज्ज्वला सासवे, प्रियंका सासवे हे गंभीर जखमी झाले. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदली होती.
पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अति. सन्त्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. दत्तूसिंग पवार, ॲड, शैलजा क्यातम, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी, तर आरोपीतर्फे ॲड. राजकुमार म्हात्रे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून दिनेश कोळी यांनी काम पाहिले.