पाच वर्षात सिंचनाचा बॅकलॉग भरून काढला:आ. शहाजीबापू पाटील
सांगोला तालुक्यातील विकासकामांबाबत आ.शहाजीबापू पाटील यांची माहिती

सांगोला :गेल्या पाच वर्षांत सांगोला विधानसभा मतदारसंघाचा खुंटलेला विकास मार्गी लावला आहे. शाश्वत विकास हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विकासकामे सुरू आहेत. विकासाचा तसेच सिंचनाचा बॅकलॉग भरून काढत असताना सर्वसामान्य शेतकरी, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पाण्याचा प्रश्न सोडवून हरित क्रांतीला चालना दिली आहे. रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. गेल्या ५५ वर्षांतील सिंचनाचा बॅकलॉग पाच वर्षांत भरून काढला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
गेल्या ५५ वर्षांत सांगोला विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या आशेने मला विधानसभेत पाठविल्याने मी गेल्या पाच वर्षांत टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसासिंचन योजना या सिंचन प्रकल्पांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय आहे. मतदारसंघात रस्ते, पाणी प्रश्न, वीजपुरवठा यासह अनेक विकासकामे हाती घेतली आहेत, तर अनेक कामे पूर्ण केली आहे. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या शासकीय विश्रामगृह,तहसील कार्यालयाला निधी उपलब्ध करून नूतनीकरणासह सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.
सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या, मात्र जवळपास १७ वर्षांपासून बासनात गुंडाळलेल्या सांगोला उपसासिंचन योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा केला. बहुप्रतिक्षित या योजनेचे स्व. बाळासाहेब ठाकरे उपसासिंचन योजना नामकरण करून तब्बल ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून, या योजनेमुळे सुमारे ३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठीच कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. सर्वसामान्य शेतकरी, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत पाण्याचा प्रश्न सोडवून हरित क्रांतीला चालना दिली. सांगोला शहरातील ईदगाह मैदानासह मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे, अशी माहिती आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली.