
सांगोला : “झाड लावा, प्रशस्तीपत्र मिळवा” हा उपक्रम आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेमार्फत राबविण्यात येत असून वृक्षारोपण करतानाचा फोटो पाठवून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
या वर्षीचा कडक उन्हाळा सर्वांनी अनुभवला आहे. पुढील उन्हाळे याहीपेक्षा कडक असणार आहेत. यातून काही प्रमाणात सुटका करून घ्यायची असेल आणि पुढच्या पिढीला सावली द्यायची असेल तर प्रत्येकाने २ झाडे कुठेही ( अंगणात/ शेतात/ रस्त्याच्या कडेला/ उपलब्ध जागेत) लावावीत असे आवाहन आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
लावलेल्या या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही आपणच स्वतः घेऊन वृक्षारोपण करतानाचा फोटो ९०११७०७०८० या व्हाट्सअप नंबर वर पाठवून या उपक्रमात सहभागी व्हावे. आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला तर्फे आपुलकीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी सर्वाना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. एक वर्षानंतर मोठ्या झालेल्या त्याच झाडाचा फोटो पाठवल्यास विशेष भेटवस्तू देऊन पुन्हा गौरव करण्यात येणार आहे. आपुलकीच्या या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी केले आहे.